रामपूर-मार्गताम्हाने दरम्यान रुंदीकरण जानेवारीपासून ,जागेची आखणी सुरू

0
380
बातम्या शेअर करा

मार्गताम्हाणे – गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. सध्या शृंगारतळी ते गुहागर असे रस्ता रुंदीकरण सुरु असून जानेवारीपासून मार्गताम्हाने ते रामपूर दरम्यान, रस्ता रुंदीकरण जानेवारीपासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरण अभियंता मराठे यांनी दिली. मार्गताम्हाने येथील पद्मावती नदीवरील पूल एक मीटरने उंच होणार असून वाहतुकीला अडचण येऊ नये म्हणून नदीत मातीचा भराव टाकून तात्पुरता रस्ता करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणाला गेल्यावर्षी मार्गताम्हाने बोऱ्याफाटा येथून देवघर-गिमवी-चिखली अशा दरम्यानचे रुंदीकरण हाती घेण्यात आले. आता पावसाळ्यानंतर रस्ता रुंदीकरणाला पुन्हा सुरुवात झाली असून शृंगारतळी ते गुहागर दरम्यान, रुंदीकरणाला सुरुवात झाली आहे. रामपूर ते मार्गताम्हाने या दरम्यानचे रस्ता रुंदीकरण जानेवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दिली. सुमारे 6 कि.मी.चे हे रुंदीकरण हाती घेण्यात येणार असून रस्त्याच्या दोनही बाजूने रुंदीकरणाच्या जागेचे रेखांकन करण्यात आले आहे. रामपूर-मार्गताम्हाने दरम्यानचे रुंदीकरण हे महत्वाचे ठरणार आहे. या दरम्यान, दोन मोठे पूल, अनेक वळणे, चढ-उतार आहेत. विशेष म्हणजे पुलांची कामे हाती घेताना मोठी कसरत ठेकेदाराला करावी लागणार आहे. उमरोली-मार्गताम्हाने सीमेवरील सुतारवाडीनजीकचा नदीवरील पूल, मार्गताम्हाने पद्मावती नदीवरील पूल असे दोन पूल महत्वाचे आहेत. हे दोनही पूल त्याच जागेवर होणार आहेत. त्यामुळे वाहतुकीला दुसरे पर्यायी रस्ते उपलब्ध नाहीत. अशावेळी वाहतुकीला अडचण येऊ म्हणून नदीमध्ये मातीचा भराव टाकून तात्पुरता रस्ता वाहतुकीसाठी तयार करण्यात येणार आहे.
सध्या दोनही बाजूने झाडी तोडण्यात येत आहे. उमरोली दरम्यान, महाकाय झाडे तोडण्यात आली. रामपूर येथून अनेक वळणे असली तरी दोनही बाजूने अनेकांची पक्की कुंपणे आहेत. लवखरी येथील मारुती मंदिर, चिवेली फाटा येथील साई मंदिर अशी लहाने मंदिरे आहेत. त्यामुळे येथील रुंदीकरण कशाप्रकारे होणार याबाबतची उत्सुकता नागरिकांना लागून आहे. रामपूर बाजारपेठेत रुंदीकरणाला फारसा अडसर नसला तरी काही ठिकाणी रस्त्याच्या दोनही बाजूने घरे आहेत. चिवेली फाटा, घोणसरे येथे रुंदीकरणाला मोठी जागा असल्याने येथील बाजारपेठेला कोणताही धोका नसल्याचे दिसून येत आहे.
मार्गताम्हानेची बाजारपेठेला धक्का पोहचणार
मार्गताम्हाने ही सुमारे 25 गावांची बाजारपेठ आहे. येथे सर्वप्रकारची दुकाने, हाँटेल, मच्छी, मटण मार्केट आहेत. संपूर्ण बाजारपेठ रस्त्याच्या दोनही बाजूने वसली असून या बाजारपेठेला मागे सरकरण्यासाठी जागाच नाही. दोनही बाजूने वस्ती, घरे असून बाजारपेठ 50 टक्के रस्त्याच्याकडेनेच आहे. त्यामुळे येथे रुंदीकरणाला मोठा अडसर येण्याची शक्यता आहे. बसथांब्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे. शिवाय रुंदीकरणाची उंची येथे वाढणार असून बाजारपेठ खाली व रस्ता वर अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. रुंदीकरण हे सरसकट होणार असून येथे कशापध्दतीने हा विषय हाताळला जाणार आहे, हे प्रत्यक्ष रुंदीकरणावेळी स्पष्ट होणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here