गुहागर ; प्राध्यापक आपल्या भेटीला,पाटपन्हाळे महाविद्यालयाचा अनोखा
शुंगारतळी – (मंगेश तावडे )- कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.परंतु त्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत हे लक्षात घेऊन पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे प्राध्यापक आपल्या भेटीला हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर जी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेला आहे.
या उपक्रमाअंतर्गत जे विद्यार्थी महाविद्यालयापासुन भौगोलिक दृष्ट्या दूर अंतरावर आहेत व ज्यांना नेटवर्कशी संबंधित समस्या आहेत, अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या घरी भेट देणे, त्यांचा या वर्षातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेणे, विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या नोट्स पुरवणे व त्यांच्या पालकांशी चर्चा करणे या गोष्टी करण्यात आल्या. ज्या विद्यार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचण आहे त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत देखील या उपक्रमाअंतर्गत करण्यात आली. वाणिज्य विभागप्रमुख प्रा. खोत एस. एस. यांनी पहिल्या टप्प्यामध्ये आबलोली, खोडदे, काजूर्ली, तिसंग, भातगाव, आवरे, सडेजांभारी, काताळे व पडवे या गावातील २१ विद्यार्थ्यांच्या घरी भेट दिली. दुसऱ्या टप्प्यामध्ये रामपूर, देवखेरकी, चिवेली, पाथर्डी, तनाळी आणि बोरगाव या गावातील १३ विद्यार्थ्यांच्या घरी भेट दिली. कोरोनाची परिस्थिती असताना देखील भेट देवून विद्यार्थ्यांचा अडचणी समजून घेतल्यामुळे व योग्य असे मार्गदर्शन करून अभ्यासाविषयक प्रेरणा दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले.