दापोली ; पर्यटन व्यवसाय बहरू लागला

0
318
बातम्या शेअर करा

दापोली – गेले आठ महिने पर्यटन उद्योगाला कोरोनामुळे चांगलीच खीळ बसली होती. मात्र, सरकारने उठवलेल्या संचारबंदीमुळे पुन्हा दापोली तालुक्यातला पर्यटन व्यवसाय बहरू लागला आहे. कोव्हिडचे भय जसजसे कमी होईल, तसतशी पर्यटकांची संख्या वाढेल. असे येथील स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान,पर्यटक यायची सुरुवात याच महिन्यात प्रथमच गांधी जयंतीला जोडून आलेल्या शनिवार, रविवारी पासून झाली. तेंव्हापासून दापोली तालुक्यातील मुरूड किनाऱ्यावर पर्यटकांची रेलचेल दिसू लागली. अनलॉक ५ चा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने आगामी काळात पर्यटन व्यवसायाला एक प्रकारचा वेग मिळेल, अशी उमेद हॉटेल, लॉज मालकांमध्ये दिसून येत आहे. 
कोरोना महामारीमुळे ऐन हंगामात २२ मार्च २०२० पासून सरकारने बंदी आणल्याने पर्यटन व्यवसायात झपाट्याने घसरण सुरू झाली. याच दरम्यान जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळात मुरूड समुद्रकिनारी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याने उरले सुरलेले अवसानही गळून पडले. समुद्रकिनारी ज्या टपरीधारकांच साहित्य होत त्याच प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. त्याची अद्यापही नुकसान भरपाई मिळलेलीच नाही याबाबत त्या टपरिधारकांकडून खेद व्यक्त केला जात आहे.
अनलॉक जाहीर केल्यानंतरही पर्यटनबंदी लागू होती. त्यामुळे व्यावसायिक दुहेरी संकटात सापडले होते. मात्र, सरकारने पर्यटनावरील बंदी हटवल्याने पुन्हा एकदा पर्यटन बहरण्यास सुरुवात झाली आहे. समुद्रकिनाऱ्यांवर गजबजाट सुरू झाला आहे. ऑक्‍टोबरच्या सुरुवातीलाच लागून सुट्ट्या आल्याने संधीचे सोने करण्यासाठी लॉकडाऊनला कंटाळलेला पर्यटक समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी बाहेर पडला आहे. दिवसेंदिवस पर्यटकांच्या वाढत्या आवकीमुळे व्यावसायिकांच्या चेहऱ्या वरही एक वेगळाच आनंद झळकून येत आहे.
त्यात पर्यटकांना मासळी खाण्याचा एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. दापोली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी वास्तव्याला आलेला पर्यटक हर्णे बंदरामध्ये मासळीसाठी येत नाही असे होत नाही. या बंदरात ताज्या मासळीसाठी प्रत्येक पर्यटक हजेरी लावतोच लावतो. इथल्या ताज्या मिळणाऱ्या मासळीचे पर्यटकांना विशेष आकर्षण वाटते. सध्या पॉपलेट, सुरमई, हलवा, कोलंबी,आदी चांगल्या प्रतीच्या मासळीची आवक सुरू झाल्याने खवय्यांसाठी पर्वणी झाली आहे. येथील निसर्गसौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडतेच; परंतु कोकणी पद्धतीच्या घरगुती जेवणाची लज्जत ही वेगळीच असते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये थोडा विसावा मिळवण्यासाठी म्हणून सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे येथील तरुणमंडळी या पर्यटनस्थळांचा आनंद लुटताना पहावयास मिळत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here