९ ऑक्टोबर पासून पुणे-मुंबई मार्गावर पुन्हा धावणार डेक्कन क्वीन व इंद्रायणी एक्सप्रेस

0
391
बातम्या शेअर करा

मुंबई – पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन व इंद्रायणी एक्स्प्रेस या दोन रेल्वेगाड्यांसह महाराष्ट्रातील ९ ऑक्टोबर (शुक्रवार) पासून पाच मार्गांवर पुन्हा गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाड्या मुंबईहून सुटून पुणे, नागपूर, गोंदिया आणि सोलापूर या शहरांच्या दरम्यान दररोज चालवण्यात येणार आहेत. कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील विविध शहरांना आणि जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वेगाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, अनलॉक ५ च्या आदेशामध्ये राज्यांतर्गत रेल्वे वाहतूक तात्काळ सुरू करावी, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले होते.

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पाच एक्स्प्रेस ट्रेनपैकी दोन एक्स्प्रेस या मुंबई आणि पुणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये धावणाऱ्या आहेत. यातील 02123/02124 ही एक्सप्रेस डेक्कन क्वीन एक्स्प्रेस प्रमाणेच त्याच वेळापत्रकानुसार मुंबई ते पुणे दरम्यान धावेल. 02015/02016 ही इंद्रायणी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार दररोज मुंबई ते पुणे दरम्यान धावेल. अशा दोन एक्सप्रेस मुंबई पुणे या दरम्यान चालवण्यात येणार आहेत.

तिसरी एक्सप्रेस 02189 असून ती मुंबई ते नागपूर दरम्यान चालवली जाणार आहे. ही एक्सप्रेस मुंबई-नागपूर दुरंतो एक्सप्रेसच्या वेळापत्रकानुसार चालवली जाईल. मुंबई आणि गोंदिया दरम्यान 02105 ही एक्सप्रेस चालवली जाईल. जी विदर्भ एक्सप्रेसच्या धर्तीवर त्याच वेळापत्रकात चालवण्यात येईल. तसेच मुंबई आणि सोलापूर या शहरांदरम्यान 02115/02116 ही एक्सप्रेस सिद्धेश्वर एक्सप्रेस नुसार चालवण्यात येणार आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण उद्या (गुरुवार) ८ तारखेपासून सुरु होणार असून तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाइन उपलब्ध असेल. या गाड्या चालवताना काही स्थानके वगळण्यात देखील आली आहेत. केवळ महत्त्वाच्या स्थानकांवर या एक्सप्रेस गाड्या थांबतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

ज्यांच्याकडे आरक्षित तिकीट असेल त्यांनाच प्रवासाची मुभा आहे, अनारक्षित तिकीट घेऊन प्रवास करता येणार नाही. हा प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि स्वतःसोबत इतर प्रवाशांची देखील काळजी घ्यावी असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. मुंबईत काम करणारे कर्मचारी, वकील,सरकारी कर्मचारी व इतर आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुणे- मुंबई दरम्यान एक्सप्रेस सोडण्याची मागणी पुणे- मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे सचिव प्रकाश संकपाळ व कार्यकारी अध्यक्ष सदाशिव जाधव यांनी केली होती.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here