गुहागर -केंद्र सरकारकडून चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना वितरित केला जातो. ग्रामपंचायतींना सदर निधी वितरित करेपर्यंत या निधीवर मिळणारे व्याज ग्रामपंचायतीच्या कामकाजाकरता वापरता येते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १३व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व १४ वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाचे पैसे जिल्हा परिषदेकडे मागवून घेण्यात आले व जिल्हा परिषदेने हे सर्व पैसे आरजीएसए खात्यात जमा न करता परस्पर त्या रकमेचा खर्च केला. सदर निधी सम प्रमाणात वितरीत न करता गैरव्यवहार केला गेला.
केंद्र सरकारकडून थेट ग्रामपंचायतीपर्यंत सर्व निधी पोहोचवण्याची जबाबदारी राज्य सरकारची व जिल्हा प्रशासनाने असताना या निधीचा निधीवरील व्याजाचा अन्य ठिकाणी वापर करणे ही आर्थिक अनियमितता आहे. केंद्र सरकारच्या निधीमध्ये अनियमितता करणारे अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी व व्याजाची रक्कम सर्व ग्रामपंचायतींना देण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
             
		
