दापोली -दापोली येथील लाकूड व्यावसायिकाकडून वाहतूक परवाना देण्यासाठी लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झालेले दापोलीचे वनपाल गणेश गंगाधर खेडेकर यांना मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांनी एका आदेशाद्वारे निलंबित केले.
दापोलीतील एका लाकूड व्यावसायिकाकडून वाहतूक परवाना देण्यासाठी दापोलीचे वनपाल गणेश खेडेकर यांनी 6 हजार 500 रुपये मागितले होते मात्र 5 हजारांची तडजोड करण्यात आली होती. 3 सप्टेंबर रोजी वनपाल दापोली कार्यालयात वनपाल गणेश खेडेकर यांच्या सांगण्यावरून 5 हजारांची लाच घेताना खाजगी व्यक्ती सचिन आंबेडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. 4 सप्टेंबर रोजी वनपाल गणेश खेडेकर व सचिन आंबेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन संशयितांना खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या अहवालाच्या आधारे दापोलीचे वनपाल गणेश खेडेकर यांना 4 सप्टेंबर पासून शासन सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक यांनी काढले आहेत.