शुंगारतळी – कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडलेली असतानाच महावितरण कंपनीने भरमसाठ वीज बिले माथी मारल्याने गुहागर तालुक्यातील शुंगारतळी येथे संतप्त ग्राहकांनी सोमवारी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. वाढीव बीलांमुळे संतप्त असलेल्या ग्राहकांनी येथील अधिकार्यांना धारेवर धरले त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. जोपर्यंत बिले कमी करून दिली जात नाही तोपर्यंत आम्ही् ती भरणार नाही. असे मयूर भोसले यांनी सांगितले.
महावितरण कंपनीने जून-जुलै महिन्यामध्ये मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांची वीज बीले सरासरी पध्दतीने काढून ती ग्राहकांना वितरीत केली आहेत. मुळात या महिन्यात झालेला प्रत्यक्ष वीज वापर आणि आलेले वीज बील यामध्ये मोठी तफावत असून वाढीव वीज बीले ग्राहकांच्या माथी मारली जात असल्याचे यावेळी संतप्त वीज ग्राहकाने सांगितले. कोरोना संकटामुळे आम्हाला कामधंदे नाहीत. अशावेळी वीज वापरापेक्षा अधिकचे बील भरणे कठीण झाले आहे. महावितरण कंपनीने दर महिन्याला बीले दिली असती तर आम्ही ती भरली असती, असे ग्राहकांनी सांगितले. यावेळी सुनील जाधव माझी सैनिक व मयुरेश भोसले उपशहर प्रमुख शृंगारतली यांच्याकडून जोपर्यंत वीज बिल सुधारून येत नाही तोपर्यंत वीज बिल न भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता महावितरण काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.