गुहागर – महसूल खात्याची कोणत्याही प्रकारची वाळू उत्खनन व वाहतूक बाबत परवानगी न घेता गेले अनेक दिवस आणि तेही मध्यरात्रीच्या वेळेनंतर पहाटे पर्यंत पालशेत आंबोशी बंदराच्या मुखाजवळ बेकायदेशीर वाळू उत्खनन चालू आहे.या विषयाची माहिती वेळोवेळी संबंधित प्रशासकीय अधिकारी , लोकप्रतिनिधी , गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील यांना लिखित स्वरूपात देऊन झालेली आहे.तरीही बेकायदेशीर वाळू उत्खनन ज्या जागेवर सुरूच आहे.
काल रात्री पुन्हा एकदा वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची चाहूल खारवी समाज बांधवांना लागली.त्वरीत समाजातील प्रमुख कार्यकर्ते एकत्र झाले. पहाटे ३ च्या सुमारास अजय विनायक नागवेकर यांच्या ताब्यातील टेम्पो क्र.एम एच १६ बी २२६५मधून २ ब्रास वाळूचे उत्खनन करून वाहतूक करत असताना सदर टेम्पो चालकाने टेम्पो रस्त्यावरून वेगाने मागे घेऊन लगत असलेल्या उमेश जोशी यांचे बागे शेजारील जागेमध्ये टेम्पो उभा करून टेम्पो चालक व इतर वाळू उत्खनन करणारे टेम्पो सोडून पळून गेले. या विषयाची माहिती त्वरित सर्कल अधिकारी मोरे यांना फोन वर देण्यात आली. नंतर घटनास्थळी लगेच तलाठी कातयाडी साहेब व पोलीस पाटील गद्रे मॅडम उपस्थित झाल्या.घडलेल्या घटनेचा पंचनामा करण्यात आला.तेव्हा २ ब्रास वाळू पैकी टेम्पो मध्ये अर्धा ब्रास, व टेम्पो खाली अर्धा ब्रास व उर्वरित एक ब्रास श्री आगडी देवी मंदिराच्या मुखा जवळ वाळू उत्खनन करून साठा केलेला निदर्शनास आला. वरील प्रमाणे वस्तुस्थिती आढळून आली तसेच सुमारे २ ब्रास वाळू साठा व टेम्पो क्र एम एच १६ बी २२६५ हा मुद्देमाल पोलीस पाटील पालशेत यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील आवश्यक ती कार्यवाही प्रसशासन करेल या अपेक्षेने खारवी समाज बांधव वाट पहात आहेत.अन्यथा प्रशासनला जाग आणण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असे सागरी सीमा मंच कोकण प्रांत प्रमुख संतोष पावरी यांनी सांगितले.