नवी दिल्ली -कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं देशात लॉकडाऊन लागू केले होते. मात्र लॉकडाउनच्या तीन टप्प्यांनंतर अनलॉक घोषित करण्यात आला.
जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्राकडून हळूहळू लॉकडाउन टप्प्याटप्प्यानं शिथिल केला जात असून, राज्याअंतर्गत आणि राज्या-राज्यातील प्रवासी व माल वाहतुकीवरील बंदीवरून केंद्रानं राज्यांना फटकारलं आहे. त्याचबरोबर ही बंदी उठवण्याचे निर्दश दिले आहेत. राज्यांतील आणि परराज्यातील वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यामध्ये प्रवासी वाहतुकीसह माल वाहतुकीचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तसंच राज्याबाहेरही खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.