चिपळूण – चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीतील एका कारखान्यात रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाड्यांना पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा अत्यंत निकृष्ट दर्जाचा, सडलेला धान्यसाठा खडपोली पंचक्रोशीतील स्थानिक ग्रामस्थांनी उजेडात आणला होता. यानंतर पुरवठादार व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत असतानाही त्यांच्यावर अद्याप कसलीही कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर येथील सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर यांनी स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गंभीर दखल घेऊन गृह खात्याच्या सचिवांना या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे आदेश दिले आहेत. अजितदादांच्या या आदेशामुळे मुराद अडरेकर यांच्या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.