रत्नागिरी -कोकणातील गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना 10 दिवसांचा क्वॉरंटाईन काळ निश्चित करण्यात आला आहे, अशावेळी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी कोणतेही वेगळे निर्णय घेऊ नयेत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. काही ग्रामपंचायतींनी येणार्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन करण्याचे ठराव केले आहेत. मात्र, क्वॉरंटाईनचा कालवधी 10 दिवसांचाच असेल, असे त्यांनी स्पष्ट करत, ठराव करणाऱ्या ग्रामपंचायतींना याबाबतच्या सूचना केल्या आहेत. रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील सरपंचांच्या घेतलेल्या बैठकीत सामंत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष प्रदिप साळवी, जि. प. आरोग्य व बांधकाम सभापती महेश म्हाप, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू जाकर आदींची उपस्थिती होती.
काही ठिकाणी रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्यांवर दबाव आणणे, त्यांना धमकावणे असे प्रकार घडत आहेत. जिल्हा रुग्णालयात असे प्रकार घडल्यास जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक योग्य ती कारवाई करतील, असा इशाराही सामंत यांनी दिला आहे.