चिपळूण – चिपळूण तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयात आता केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. अन्य आजार असलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवरील येणारा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी अजय सानप यांनी दिली.
मध्यंतरी ८० कोरोनाबाधित रुग्ण दाखल असताना आमच्या रुग्णांना चांगली सेवा मिळत नाही, असा आरोप करत काही नातेवाईकांनी डॉक्टरांना दमदाटी केली होती. त्यामुळे काही डॉक्टर रजेवर तर काहींनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. जिल्हा शल्यचिकित्सकांनी भेट घेऊन या डॉक्टरांच्या भावना समजून घेतल्या. रुग्णालयात एकूण दहा डॉक्टर होते, त्यापैकी पाचजण वेगवेगळ्या कारणांनी गैरहजर आहेत. पाच डॉक्टरांना उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभार सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत होती. आमदार शेखर निकम यांच्यासह जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून डॉक्टरांची समजूत काढली. त्यामुळे पाच पैकी तीन डॉक्टर हजर झाले आहेत.
.