गुहागर – गुहागर नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी अखेर पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुहूर्त मिळाला आहे. नगराध्यक्ष पदासाठी याठिकाणी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला असून ॲड. सुप्रिया वाघधरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी दिली.
गुहागर नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ठीकठिकाणी राजकीय वातावरण जोरदार तापू लागले आहे. प्रत्येक पक्षाकडून आपले जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.तसेच नगराध्यक्ष पदासाठी देखील अनेक जण इच्छुक आहेत. सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार प्रत्येक पक्ष शोधत आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरीदेखील अखेर पाचव्या दिवशी याठिकाणी पहिला उमेदवारी अर्ज भरण्यात आला.मात्र तोदेखील अपक्ष उमेदवाराने भरल्याने अद्यापही राजकीय पक्ष उमेदवारी दाखल करत नसल्याने त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.
















