गुहागर – गुहागर समुद्रकिनारी असलेल्या जेटी आणि सी व्ह्यू गॅलरी पाठोपाठ आता गुहागर शहरातील अनधिकृत बांधकामांनाही फटका बसला आहे. गुहागर शहरातील १५ हॉटेल व्यावसायिकांना प्राधान्याने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे आता अनधिकृत बांधकाम केलेल्या शहरवासीयांचेही धाबे दणाणले आहे.
गुहागर शहरातील या १५ हॉटेल व्यावसायिकांनी महाराष्ट्र सागरी नियमन व्यवस्थापन समितीची परवानगी न घेता, बांधकामे केली त्यामुळे हे सर्वचजण हरित लवादाच्या निर्णयामुळे अडचणीत सापडले आहेत प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी न घेता बांधलेल्या इमारतींचे पंचनामे केले आहेत. याबाबत गुहागर शहरातील हॉटेल व्यवसायिक यांनी प्रांतअधिकारी यांच्या सोबत चर्चा केली. मात्र यावेळी सदर कारवाई हरित लवादाच्या निर्णयानुसार सुरू आहे. त्यामुळे शासन काहीच करू शकत नाही, असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे गुहागर शहरातील परवानगी न घेता इमारती बांधकाम केलेल्या शहरवासीयांचे धाबे दणाणलेत. आधीच विविध कारणांमुळे गेली दोन वर्ष गुहागर शहरातील पर्यटन व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याचवेळी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे.