संगमेश्वर – कर्नाटकातून अपहरण करून आणलेली एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे येथील रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे आणि माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. या प्रकरणी कर्नाटकातील निपाणी पोलिसांनी बुरंबाड (ता. संगमेश्वर) येथील संशयित तरुण विघ्नेश संजय गुरव याच्यावर कारवाई सुरू केली आहे.
कोंडिवरे येथील रिक्षाचालक इरफान खान हे आपली रिक्षा घेऊन आरवलीच्या दिशेने जात असताना त्यांना एक मुलगी रस्त्याच्या कडेला धावताना दिसली. त्यांनी रिक्षा थांबवून विचारणा केली असता, त्या मुलीने रडत “माझं अपहरण झालं आहे” असे सांगितले. तात्काळ प्रसंगावधान राखून इरफान खान यांनी माखजन पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक विवेक साळवी यांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी केली.
मुलीने दिलेल्या माहितीनुसार, ती मूळची आदर्शनगर, निपाणी, जि. बेळगाव, कर्नाटक येथील असून, कागल (जि. कोल्हापूर) येथील कॉलेजमध्ये इ. ११ वी कॉमर्स शिकत आहे. २० सप्टेंबर २०२५ रोजी कॉलेजला जात असताना, कागल बसस्थानकात तिच्या वर्गमित्राने – विघ्नेश संजय गुरव (रा. बुरंबाड, सध्या रा. कागल) याने हत्याराचा धाक दाखवून तिचं अपहरण केलं. तिला पंढरपूर, मुंबई (दादर), पुन्हा पंढरपूर, कराड, आणि अखेरीस बुरंबाड बौद्धवाडी (ता. संगमेश्वर) येथे आणण्यात आले. ती म्हणाली की, विघ्नेश गुरवने तिच्यावर बळजबरी केली, धमकी दिली, मोबाईल फोडून सीम तोडून टाकली. त्याने तिला बुरंबाड येथील घरी त्याची आई अश्विनी गुरवच्या मदतीने कोंडून ठेवलं होतं. १ ऑक्टोबर रोजी विघ्नेश व त्याची आई कोल्हापूरला गेल्याचा फायदा घेत तिने मागच्या दरवाजाने पलायन केलं आणि रस्त्यावर धावताना ती रिक्षाचालकाच्या नजरेस पडली. मुलीने तिच्या मामाचा – विशाल रावळ (रा. इचलकरंजी) – उल्लेख केला. पोलिसांनी संपर्क साधल्यावर कळले की, तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार निपाणी पोलीस ठाण्यात दाखल असून, गुन्हा क्र. ९६/२०२५, भारतीय दंड संहितेच्या बी. एन. एस. १३७ (२) अंतर्गत नोंद आहे. सध्या निपाणी पोलिसांनी संगमेश्वरमध्ये येऊन पीडित मुलीला ताब्यात घेतले असून, विघ्नेश गुरव याच्यावर अपहरण व बलात्काराचे गुन्हे दाखल करून कारवाई सुरू आहे.