खेड -पक्षातून हकालपट्टी झाल्यावर वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आता, ४ सप्टेंबर रोजी वैभव खेडेकर यांच्यासोबत इतरही प्रमुख नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मनसेची ताकद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खेड, राजापूर, चिपळूण आणि माणगाव या भागांमधील काही प्रमुख मनसे नेत्यांना काही दिवसांपूर्वीच पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून बाहेर काढण्यात आले होते. या नेत्यांमध्ये वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर ,संतोष नलावडे , आणि सुबोध जाधव यांचा समावेश होता. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी ही कारवाई जाहीर केली होती.
आज खेड येथे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर येत्या ४ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पक्षामध्ये (भाजप) प्रवेश करणार आहेत. मुंबईतील नरिमन पॉईंट येथे शेकडो कार्यकर्त्यांसोबत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल अशी ही माहिती त्यांनी दिली.