वाई – सातारा जिल्ह्यातील वाई शहरात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू झाला असून, घरगुती तसेच मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन होऊ लागले आहे. मात्र, पूर्वसंध्येलाच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका डॉल्बीवर वाई पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सोनगीरवाडी, वाई येथे मर्यादेपेक्षा जास्त आवाजात लावलेल्या डॉल्बीवर वाई पोलिसांनी कारवाई केली आहे.
वाई तालुक्यात डॉल्बीच्या गोंगाटावर वाई पोलिसांनी प्रथमच ठाम आणि धडाडीची कारवाई करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी प्रसाद बबन दुदुस्कर यांनी वाई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, प्रसाद सुरेश जाधव, आकाश मुकुंद कांबळे, आणि कुणाल खरात, यांनी महिंद्रा ट्रॅक्टर वापरून सार्वजनिक ठिकाणी डॉल्बीच्या माध्यमातून कर्कश गाणी वाजवत शांततेचा भंग केला. सदर आरोपींनी ट्रॅक्टर रस्त्याच्या मधोमध उभा करून, नागरीकांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण करत गंभीर सार्वजनिक उपद्रव केला. ही घटना सोनगिरवाडी परिसरात नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाजवळ, बावधन नाका ते छत्रपती शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. ही कारवाई पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. “सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कायद्याचे कडक पालन करूनच अशा प्रकारांना आळा घालणार,” असे पो. नि. शहाणे यांनी सांगितले. वाई तालुक्यात ही डॉल्बीविरोधात नोंदवलेली पहिली अधिकृत कारवाई असल्याने ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व नागरिकांतून पोलीस दलाच्या या कृतीचे स्वागत होत आहे. मात्र, आजही काही व्यावसायिक तसेच गणेश मंडळे लोकप्रतिनिधींचे नाव घेऊन त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, जनतेचा उठाव विचारात घेता लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्या गणेश मंडळांवर ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पो. नि. जितेंद्र शहाणे यांनी दिला आहे. या कायद्यांतर्गत दोषींना ५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षेची तरतूद असल्याचे सांगून गणेशोत्सवात महिलांचा, मुलांचा सहभाग असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ऐतिहासिक मिरवणूक काढून वाई तालुक्याचा महाराष्ट्रात नावलौकिक करावा, असे आवाहनही पो. नि. शहाणे यांनी केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आवाजाच्या भिंती (डॉल्बी यंत्रणा) पोलीस यंत्रणेच्या रडावर आहेत. मात्र ह्या डॉल्बीच्या आवाजाचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये. हा उत्सव श्रद्धेचा उत्सव आहे. उगाच डॉल्बी लावण्याच्या चढाओढीतून विनाकारण दुर्घटनेला आमंत्रण दिले जाऊ नये अशी रोखठोक प्रतिक्रिया पो. नि. शहाणे यांनी दिली आहे.