खेड – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या काही पदाधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले असून त्यामध्ये पक्षाचे नियम व धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे वैभव खेडेकर (खेड, रत्नागिरी), अविनाश सौंदळकर (राजापूर, रत्नागिरी), संतोष नलावडे (चिपळूण, रत्नागिरी) आणि सुबोध जाधव (माणगाव, रायगड) यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षातून बडतर्फ करण्यात आले.
मनसे सचिवालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकात, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कारवाईची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. अखेर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. खेड शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मनसेची ताकद उभी करण्यात वैभव खेडेकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या बडतर्फीमुळे पक्षाला कोकणात मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वैभव खेडेकर यांच्या निलंबन पत्रावर चक्क अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांची सही असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात वैभव खेडेकर नक्की कोणती भूमिका घेणार याकडेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. वैभव खेडेकर यांनी मनसे पक्ष खेडसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तळागाळापर्यंत रुजवला आहे. त्यांच्यावर झालेल्या कारवाईने आता जिल्ह्यातील मनसैनिक नक्की कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिला आहे.