गुहागर- गुहागर तालुक्यातील कोळवली परिसरात अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असून संबंधित अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या ठिकाणच्या नागरिकांमधून केला जात आहे. कोळवली येथील एक राजकीय पुढारी ही वाळू बिनधास्तपणे काढत असल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे. त्यामुळे दिवसा पुढारी आणि रात्री वाळू चोरी अशी चर्चा या परिसरात सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कुठेही वाळू उत्खनन करण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यातच गेल्या पंधरा दिवसापासून गुहागर तालुक्यातील कोळवली बंदर येते बिनधास्तपणे वाळू उपसा सुरू आहे. हा वाळू उपसा प्रशासनाच्या परवानगीने सुरू आहे. का..? याची माहिती घेतली असता गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी असे सांगितले की गुहागर तालुक्यात कोणत्याही ठिकाणी वाळू उत्खन न परवानगी दिलेली नाही. जर कुठे अनाधिकृत पणे वाळू उत्खनन केले जात असेल तर त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू असे त्यांनी सांगितले. मात्र असे असले तरी या ठिकाणी राजरोसपणे वाळू उत्खन करणारा हा राजकीय पुढारी नक्की कोणत्या पक्षाचा आहे.? त्याला नक्की कोणाचा आशीर्वाद आहे.? व त्याच्यावर का कारवाई केली जात नाही. अशी चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत सुरू आहे.