प्रशांत यादव यांचा भाजप प्रवेश,हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार

0
250
बातम्या शेअर करा

चिपळूण — कोकणातील सर्वसामान्यांचा असामान्य नेता, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन, सहकारातून हजारो कुटुंबांना रोजगार देणारे आणि चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातून अल्पशा मतांनी पराभूत झालेले लोकप्रिय तरुण नेते प्रशांत बबन यादव आज मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी ३ वाजता हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्यासह कोकणातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा नव्या राजकीय प्रवासाचा साक्षीदार ठरणार आहे.

प्रशांत यादव गेली काही वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रात वावरत असताना २५ व्या वर्षी ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून येत, उपसरपंच आणि सरपंचपद भूषविताना तसेच जवळपास १५ वर्षे ग्रामपंचायतीच्या कारभारात राहून खेर्डी गावच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली. नंतर सामाजिक कार्यातून राजकारणात पाऊल ठेवत प्रशांत यादव यांनी काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून २०१८ ते २०२४ दरम्यान संघटनाला नवी ऊर्जा दिली. तरुणांची नवी फळी निर्माण केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गटात प्रवेश करून अवघ्या काही महिन्यांत प्रदेश सरचिटणीसपदी झेप घेतली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले. केवळ ६ हजार मतांनी पराभव झाला, पण तब्बल ९० हजार मतदारांनी त्यांना साथ दिली. यातून प्रशांत यादव यांचे राजकीय नेतृत्व सिद्ध झाले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मत्स्य व्यवसाय बंदरे, विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी चिपळूण दौऱ्यावर वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा देत आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे प्रशांत यादव यांच्या सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील वाटचालीचे भरभरून कौतुक करताना मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रशांत यादव भाजपमध्ये १९ रोजी मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश करणार आहेत, अशी घोषणा केली.

यानुसार या प्रवेश सोहळ्यासाठी प्रशांत यादव व समर्थकांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. चिपळूण वालोपे येथून मुंबईच्या दिशेने मंगळवार दिनांक १९ रोजी सकाळी ७ वाजता गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. यावेळी अन्य पक्षातील हजारो प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश असणार आहे. यावरून हा प्रवेश भव्य दिव्य होणार असल्याची चर्चा सुरू असून चिपळूणच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. यातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चिपळूण -संगमेश्वर मोठी संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here