चिपळूण ; उड्डाणपुलाच्या कामावेळी विद्यार्थ्याच्या अंगावर पडली सळी. ..विद्यार्थी जखमी

0
410
बातम्या शेअर करा

चिपळूण- मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. डीबीजे महाविद्यालयासमोर एका पिलवरून लोखंडी सळी टाकण्याचे काम सुरू असताना त्यातील एक सळी रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातावर पडली. यात विद्यार्थी बालंबाल बचावला असून त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. यावेळी संतप्त शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या युवासेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केला. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

यावेळी मनसेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांच्यासह शिवसेना युवा सेना तालुकाधिकारी निहार कोवळे यांनी प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले. जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात होता. पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांची समजूत काढली जात होती. मात्र, शिवसेना (शिंदे गट) व मनसेचे पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र, तोपर्यंत वाहनांची मोठी रांग लागली होती. गेल्या काही वर्षापासून शहरातील बहादूरशेखनाका ते पाग बौद्धवाडी दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम सुरवातीपासूनच या ना त्या कारणाने वादग्रस्त बनले आहे.

दोन वर्षापुर्वी बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाचे गर्डर कोसळल्याची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर काही महिन्यातच पिलरवरून दोन कर्मचारी पडून गंभीर जखमी झाले होते. त्यापाठोपाठ सुरक्षितेसाठी पुलाच्या ठिकाणी लावलेली जाळी एका धावत्या ट्रकला अडकली होती. त्यामुळे देखील मोठा धोका निर्माण झाला होता. याशिवाय सातत्याने या परिसरात किरकोळ व मोठे अपघात आहेत.या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर संबंधीत ठेकेदार कंपनीला प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना सातत्याने केल्या होत्या. अशातच आज डीबीजे महाविद्यालयासमोर उड्डाणपुलावर पिलरसाठी टाकण्यात येत असलेली लोखंडी सळी अचानक खाली पडली. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी अथर्व शिंदे याच्यावर पडली. यात त्याच्या हाताला दुखापत झाली. त्याला तत्काळ उपचारासाठी खासगी रूग्णालयात नेण्यात आले. या घटनेने ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.याबाबत ठेकेदार कंपनीने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here