मुंबई- गेल्या सात वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर असलेले जयंत पाटील यांनी अखेर राजीनामा दिला असून नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून साताऱ्याच्या शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा पक्षाकडून अधिकृतरित्या करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण बैठकीत जयंत पाटील यांनी निरोपाचे भाषण केले. त्यानंतर पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान शशिकांत शिंदे यांच्यासमोर असेल.लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षात फेरबदल व्हावेत, अध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्या नेत्याकडे द्यावीत, अशी पक्षांतर्गत मागणी होऊ लागली. मात्र लोकसभा निवडणुका जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच लढल्या जातील, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
पाच वर्षे बांधलेले संघटन, बिनचूक उमेदवारांची निवड आणि सरकारविरोधी जनमताचा फायदा राष्ट्रवादीला होऊन लोकसभा निवडणुकीत जयंतरावांच्या नेतृत्वात १० पैकी तब्बल ८ खासदार निवडून आले. विधानसभेलाही हीच रणनीती कायम ठेवून जयंत पाटील यांनी राज्य पिंजून काढले. परंतु यावेळी महायुतीने मविआला जोरदार धोबीपछाड दिल्याने जयंतरावांना पक्षाची सदस्यसंख्या विशीपारही घेऊन जाण्यात अपयश आले. तेव्हापासून जयंत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीजोर धरू लागली. जुलै २०१८ ते जुलै २०२५ अशी सात वर्षे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले.