खेड- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ येथील खोपी फाटा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग करत एका कार थांबवली. या दोघांनी कारवर दगडफेक करून काचा फोडल्या. त्यानंतर एका तरुणाने थेट रिवॉल्वर बाहेर काढून हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे प्रचंड घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
कोकणात दिवसाढवळ्या अशा पद्धतीने खुलेआम फायरिंग होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. दोघांनी कारसमोर त्यांची दुचाकी आडवी लावली. त्यानंतर कारवर दगडफेक केली. त्यानंतर दोघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पुढे दुचाकीवरील एका तरुणाने रिवॉल्वर काढून हवेत गोळी झाडली. संपूर्ण प्रकार काही सेकंदात घडल्याने कारमधील व्यक्ती घाबरून गेली. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.गोळीबाराच्या या घटनेनंतर खेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी तातडीने पंचनामा सुरू केला. गोळीबार केलेल्या रिवॉल्वरची पुंगळी घटनास्थळी शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.















