दापोली – दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील केतकी बीच समोरील समुद्रात आज सायंकाळी विश्रांती वाडी, पुणे येथील एका महिला पर्यटकाचा बुडून मुत्यू झाला आहे.
उन्हाळी सुट्टी चालू झाल्याने पर्यटकांचा ओघ दापोलीच्या किनारपट्टीला वाढत चालला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथून आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एक १२ जणांचा ग्रुप दापोली येथील आंजर्ले येथे पर्यटनासाठी निघाले ते आंजर्ले येथील केतकी बीच रिसॉर्ट येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचले . यामध्ये ६ मुली व ६ मुले असा मित्रमंडळींचा ग्रुप होता. आज संध्याकाळी ४:३० च्या सुमारास हे १२ जण मित्रमंडळी पोहायला गेले होते. पोहता पोहता मोठी लाट आली त्यावेळी तन्वी निलेश पारखी राहणार – विश्रांती वाडी, पुणे या युवतीला पाण्याचा अंदाज नाही आला त्यामुळे ती तिथेच बुडाली. त्यावेळी सोबत असलेल्या मित्रानी धावत जाऊन किनाऱ्यावरील ग्रामस्थांना माहिती दिल्यावर ग्रामस्थांनी पाण्यात बुडालेल्या तन्वीला पाण्याबाहेर काढून किनाऱ्यावर आणले मात्र तन्वी बेशुद्ध पडली होती.तिला उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. दापोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु आहे. केतकी बीच समोरील समुद्रात याआधीही तीन पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.