वाई – ( प्रविण गाडे ) – सातारा जिल्ह्यातील पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात कार २०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी हे सर्वजण कोकणात फिरण्यासाठी गेले होते. कोकणातून परत जाण्यासाठी महाबळेश्वर पाचगणी वाईमार्गे पुण्याला जात असताना सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरापासून १०० मीटर अंतरावर कार खोल दरीत कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने व घाट उताराचा अंदाज न झाल्याने गाडी खोल दरीत कोसळली. यामध्ये बजरंग पर्वत काळभोर, वैभव काळभोर, सौरभ जालिंदर काळभोर, अक्षय मस्कु काळभोर, सर्व रा. लोणी काळभोर, पुणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना वाई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस तसेच शिव सह्याद्री रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले.