शृंगारतळी – गुहागर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत अंतिम सामन्यात डॉक्टर 11 या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेला विविध विभागांच्या संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेमध्ये पोलीस होमगार्ड टीम गुहागर, शिक्षक टीम गुहागर, ग्रामपंचायत अधिकारी चिपळूण, महावितरण टीम गुहागर, कोतवाल संघटना गुहागर, डेटा ऑपरेटर टीम गुहागर, शिक्षक संघटना शृंगारतळी, बँक कर्मचारी संघ, आरोग्य विभाग गुहागर, डॉक्टर 11 गुहागर आणि पंचायत समिती गुहागर या संघांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे पंचायत समिती गुहागर संघाचे नेतृत्व तालुक्याचे गटविकास अधिकारी शेखर भिल्लारे यांनी केले. त्यांनी स्वतः उत्कृष्ट खेळ करत सामन्यातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार पटकावला. तसेच, स्पर्धेचा मालिकावीर पुरस्कार डॉ. काळे यांना प्रदान करण्यात आला.स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अक्षय आणि उत्कृष्ट गोलंदाज सौरभ पटेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी चषक देऊन गौरविण्यात आले.
चुरशीच्या अंतिम फेरीत पंचायत समिती गुहागर संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर डॉक्टर 11 संघाने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक जिंकला.
ही स्पर्धा केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढवण्यासाठी आणि आरोग्य जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. सातत्याने आपल्या कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना एकत्र आणल्याबद्दल ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे विशेष आभार गटविकास अधिकारी भिल्लारे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि खेळाडूंचे विशेष कौतुक करण्यात आले.