गुहागर ; अडूर ग्रामस्थांचे तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

0
734
बातम्या शेअर करा

गुहागर – पोलीस प्रशासनाने धम्मचक्र प्रवर्तन दिन व महापरिनिर्वाण दिनी बौध्द विहारला ठाळे ठोकणे, सशस्‍त्र पहारा ठेवणे पुजापाठापासून वंचित ठेवल्याने गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या बदलीच्या मागणीसाठी बौध्दजन सहकारी संघ, अडूर (स्थानिक) शाखा क्र. 40 च्या ग्रामस्थांनी 26 पासून उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. गेल्या तीन दिवसापासून हे उपोषण सुरू असून अद्यापही याबाबत तोडगा निघत नसल्याने सध्या सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या उपोषणासाठी गावातील पुरुष, महिला व शाळकरी मुले सहभागी झाले आहेत.

धर्मप्रवर्तन दिन आणि महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमांना गुहागरच्या पोलीस निरीक्षकांनी जाणिवपूर्वक अटकाव केला. या दिवशी बौध्दविहाराला टाळे ठोकून आम्हाला कार्यक्रम करण्यास मज्‍जाव केला. त्यामुळे आमचा अपमान झाला आहे. आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे आम्ही तक्रारी केल्या मात्र याबाबत आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे हा उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे ग्रामस्थ सांगतात.

या संपूर्ण प्रकरणामध्ये गुहागरच्या पोलीस निरिक्षकांची येथून बदली व्हावी या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. या संदर्भातील निवेदन यापूर्वीच जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना दिले आहे. 26 जानेवारीपर्यंत बदली झाली नाही तर बौध्दजन सहकारी संघ अडूर, शाखा क्र. 40 च्या सर्व ग्रामस्थांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी सकाळपासून गुहागर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहेत. यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील आणि विभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांनी ग्रामस्थांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले, मात्र, ग्रामस्थांनी जोपर्यंत सचिन सावंत यांची बदली होत नाही, तोपर्यंत उपोषण आम्ही मागे घेणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
या उपोषणामध्ये दिलीप सदाशिव जाधव (अध्यक्ष), विलास नारायण जाधव (सचिव), सचिन जाधव, मनिषा जाधव (माजी सरपंच), यशवंत धर्माजी जाधव, दिपक जाधव, राजेंद्र जाधव, महेश पवार, प्रमोद जाधव, स्नेहा जाधव, विशाल जाधव, दिनेश सावंत, अशोक गोपाळ जाधव, प्रकाश जाधव, आनंद जाधव, प्रथमेश जाधव, निकिता जाधव, हेमांगी जाधव आदीसह महिला व शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here