वाई – वाई-महाबळेश्वर रस्त्यावर वाई बस स्थानकासमोर भरधाव कारने पादचार्यांना ठोकर मारल्याने एकाचा जागीच मृत्यू तर साडेतीन वर्षाच्या मुलासह अन्य चारजण गंभीर जखमी झाले. वाहन चालकाला वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाई बस स्थानकासमोर महाबळेश्वरहून वाईकडे भरधाव वेगात येणाऱ्या कारने रस्त्याकडेने चालणाऱ्या पादचार्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात राजेंद्र बजरंग मोहिते, रा. सोळशी, ता. कोरेगाव यांचा जागीच मृत्यू झाला. अक्षय कदम व अविनाश केळगणे, रा. वारोशी, ता. महाबळेश्वर, सिताराम धायगुडे, रा. वाई व शिवांश जालिंदर शिंगटे, रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव हा साडेतीन वर्षांचा मुलगा हे गंभीर जखमी झाले. जखमींना वाई व सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताने बस स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक व आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी भरधाव वाहन अडवून चालकाला चोप दिला. गाडीतील अन्य तीनजण पळून गेले. हसन जिन्नस साहेब बोरवी, रा. कोरची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याचा तपास उपनिरीक्षक बिपिन चव्हाण तपास करत आहेत.