चिपळूण- केल्याने होतं असते,आधी केले पाहिजे,ही म्हण सत्यात उतरली आहे.अखिल भारतीय मराठा संघाने हे करून दाखवले आहे.कंत्राटी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी अखिल भारतीय मराठा संघाने उभारलेल्या लढल्याला यश आले असून रत्नागिरी येथील शिक्षक भरतीत तब्बल ४९५ स्थानिकांना नियुक्ती देण्यात आली आहे.त्यामुळे मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांचे सर्वत्र कौतुक व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
शाळांमधील रिक्त असलेल्या जागांवर कंत्राटी पद्धतीने डीएड,बीएड व पदवीधर बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी राज्य शासनाने ५ सप्टेंबर रोजी आदेश काढले होते.त्यानुसार भरतीप्रक्रिया राबवण्याचे आदेश देखील संबंधित विभागाला देण्यात आले होते.राज्यात अनेक ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली होती मात्र रत्नागिरी जिल्हा त्याला अपवाद ठरला होता.रत्नागिरी जिल्ह्यात भरती प्रक्रिया ठप्प होती.त्याची दखल घेत संदीप सावंत यांनी थेट आवाज उठवत प्रशासनाला लक्ष्य केले होते.
शासन निर्णयाप्रमाणे शिक्षक भरती तात्काळ सुरू करा आणि सर्वप्रथम स्थानिकांना प्राधान्य द्या.अशी मागणी देखील केली होती.स्थानिकांना वगळून बाहेरील उमेदवारांची भरती करण्यात आली तर एकालाही जिल्ह्यात काम करू देणार नाही.नियुक्तीच्या ठिकाणी घुसून हुसकावून लावू,वेळप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप ठोकू असा गर्भित इशारा देत थेट आंदोलनाची भूमिका घेतली होती.संदीप सावंत यांच्या या भूमिकेला सर्वपक्षीय व सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला.इच्छुक उमेदवारांनी तर चक्क मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले होते.जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी देखील या विषयाची दखल घेतली होती.त्यामुळे प्रशासनावर चांगलाच दबाव निर्माण झाला होता
अखेर अखिल भारतीय मराठा संघाच्या लढ्याला यश आले आणि शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.मात्र भरतीत स्थानिक किती याकडे संदीप सावंत यांनी बारीक लक्ष ठेवले होते.उमेदवारांची यादीच त्यांच्याकडे होती.त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट राहिले.आणि शिक्षक भरती प्रक्रियेत तब्बल ४९५ स्थानिकांना नियुक्ती देण्यात आली.अखिल भारतीय मराठा संघ तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तसेच जिल्हा बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष सुदर्शन मोहिते व इतर इच्छुकांनी उभारलेल्या लढ्यामुळे जिल्ह्यातील ४९५ बेरोजगार आज शिक्षक म्हणून कामाला लागले आहेत.