पुणे – चिपळूणच्या तरुणीचा प्रेमप्रकरण आणि पैशाच्या व्यवहारातून कात्रज येथे खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेने चिपळुणात पडसाद उमटले आहेत. शुभदा कोदारे (मुळ चिपळूण, स्थायिक कराड, नोकरी निमित्त पुणे बालाजी नगर, कात्रज) असे खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. तर कृष्णा सत्यनारायण कनोजा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली.
शुभदा मूळची चिपळूण येथील असून तिचे वडील व्यवसाय निमित्ताने कराड येथे स्थायिक आहेत. ती नोकरीमुळे पाच वर्षांपासून पुण्यात राहत होती. 2022 विमाननगर येथील डब्लूएनएस कंपनीत काम करत असताना, कृष्णा आणि शुभदा या दोघांची ओळख झाली. कृष्णा हा लिपिक पदावर, तर शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. पुढे दोघांचा चांगला परिचय झाला. त्यातून प्रेम संबंध जुळले.
शुभदाने आपले वडील आजारी असल्याचे सांगून त्यांच्या उपचारांसाठी कृष्णा याच्याकडून वेळोवेळी 4 लाख रुपये घेतले. तिच्या सतत पैसे मागण्यामुळे कृष्णाला संशय आला. अडीच महिन्यांपूर्वी त्याने थेट कराड गाठून तिच्या वडिलांची भेट घेतली. त्यावेळी आपले पैसे शुभदाने वडिलांच्या उपचारांच्या नावाखाली खाल्ल्याचे समजले. तिचे खोटे बोलणे कृष्णाच्या जिव्हारी लागले. कृष्णाचीही परिस्थिती जेमतेमच आहे.आपण कष्टाने कमावलेले पैसे तिने खोटे बोलून आपल्याकडून घेतले, हे त्याच्या डोक्यात बसले होते. शुभदाचे खोटे बोलणे त्याच्या जिव्हारी लागले होते. त्यातूनच कृष्णा याने शुभदाला धडा शिकविण्याचे मनाशी ठरवले. कृष्णाच्या मनात शुभदाला जखमी करायचे होते. येरडवा येथील डब्ल्यू एन. एस. कंपनीच्या पार्किंगमध्ये सायंकाळी 6 वाजता कृष्णा याने तिच्यावर सपासप वार केले. मात्र, रागात त्याने तिच्या हातावर जोरात चाकूने वार केले. तिला शुगरचा आजार होता. मोठा रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिस सांगतात.