चिपळूण – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार यावर्षी चिपळूण पत्रकार संघाला जाहीर झाला आहे. दि. १ फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
चिपळूण पत्रकार संघ हा नोंदणीकृत पत्रकार संघ असून गेली अनेक वर्षे चिपळूणमध्ये कार्यरत आहे. या पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. याची दखल घेऊन मराठी पत्रकार परिषदेने हा पुरस्कार चिपळूण पत्रकार संघाला जाहीर केला आहे. गतवर्षी चिपळूण पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश पाटील यांच्या पुढाकाराने माणूसकीचा झरा हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला जिल्हाभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्याची दखल जिल्हा तसेच राज्यभरात घेतली गेली. या उपक्रमाबद्दल संघटनेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या शिवाय आरोग्य शिबिर, गरजूंना मदत, गुणगौरव, रक्तदान, पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर असे अनेक उपक्रम संघटनेतर्फे घेण्यात येत आहेत. यामुळेच मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख व सरचिटणीस सुरेश नाईकवडी यांनी या कार्याची दखल घेत राज्यभरातून उत्कृष्ट पत्रकार संघ म्हणून चिपळूण पत्रकार संघटनेची निवड केलीआहे. संघटनेचे अध्यक्ष नागेश पाटील यांसह संतोष सावर्डेकर, बाळू कांबळे, गौरव तांबे, महेंद्र कासेकर, समीर जाधव, मुझफ्फर खान, राजेंद्र शिंदे, राजेश जाधव, संदीप बांद्रे, संतोष कुळ्ये, सुभाष कदम, सुशांत कांबळे आणि सुनील दाभोळे आदींचे अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक, हेमंत वणजू, मिलिंद अष्टीवकर, कोकण विभागीय सचिव मनोज खांबे, जिल्हाध्यक्ष आनंद चाफेकर व जिल्हाभरातून चिपळूण पत्रकार संघाचे अभिनंदन होत आहे.