चिपळूण – रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रमाणे भविष्यात चिपळूणमध्येही विमान सेवा सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांना पत्रव्यवहार करून चिपळुणात विमानतळ होण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे ही सेवा कार्यान्वित झाल्यास चिपळूणचे महत्व आणखीनच वाढणार आहे.
आ. निकम यांनी खा. राणे यांना केलेल्या पत्रव्यवहारात नमूद केले आहे, माजी आमदार स्व. निशिकांत उर्फ नाना जोशी हे आमदार असताना चिपळूणमधील टेरव आणि धामनवणे येथील माळरानावर विमानतळ व्हावे असा प्रस्ताव शासनाला सुचविला होता. त्यानंतर तत्कालीन खासदार स्व. गोविंदराव निकम व माजी पंचायत समिती सभापती स्व. बाळासाहेब माटे यांनीही शासनाने यासंदर्भात शिफारस केली होती. एवढेच नव्हे तर या मागणीनुसार टेरव ग्रामपंचायतने सुद्धा सर्वोतोपरी सहकार्य करण्याची सहमती दर्शविली होती. या सर्व बाबींचा विचार करून चिपळूणमध्ये विमान सेवा सुरू होण्यासाठी आपल्या स्तरावर पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडून अहवाल तयार करावा, अशी मागणी आ. निकम यांनी केली आहे. आता त्यांच्या या मागणीला खासदार नारायण राणे प्रतिसाद देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.