बातम्या शेअर करा

खेड- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वावे-धनगरवाडी येथील एका मयत व्यक्तीला मरणानंतरही त्या व्यक्तीच्या मृतदेहाला भयानक यातना सहन कराव्या लागल्या मृतदेह रस्त्याअभावी ग्रामस्थांनी दीड किलोमीटर हातातून घेऊन जावा लागला. त्यामुळे या ठिकाणी रस्ता करून आम्हाला या अडचणीतून नूतन मंत्री आमदार योगेश कदम नक्कीच सोडवतील अशी आशा येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

तळे-देऊळवाडी येथून प्रदीप ढेबे खेडच्या दिशेने येत होता. याचदरम्यान खेड – तळे मार्गावर कारने धडक दिल्यानंतर तो रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीवर जावून आदळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. प्रदीप ढेबे याच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र त्यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका करण्यात आली. परंतु ही रुग्णवाहिका किंजळे तर्फे नातू कळकरायवाडी या ठिकाणी येऊन थांबली. त्यानंतर पुढील मार्ग खराब असल्याने पायी जाण्याशिवाय पर्याय नसल्याने अखेर ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह हातात घेऊन तब्बल दीड किलोमीटर पायपीट करत न्यावा लागला. मात्र रस्त्याअभावी येथील ग्रामस्थांना नेहमीच पायपीट करावी लागत आहे. मागील दोन वर्षांपासून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे.

प्रदीप याच्या मृत्यूपूर्वी आठ दिवसांपूर्वी याच गावतील एका महिलेला सर्पदंश झाल्यामुळे त्यांनाही उचलून झोळीमधून कळकरायवाडी या ठिकाणी आणावे लागले. त्यानंतर पुढील उपचारासाठी न्यावे लागले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने किंजळे तर्फे नातू कळकरायवाडी ते धनगरवाडी तसेच वावे तर्फे नातू गायकर वाडी ते ढेबेवाडी हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करून धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here