गुहागर – गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा अवघ्या 2821 मतानी झालेला पराभव हा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र याचबरोबर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी राजेश बेंडल यांना एवढी प्रचंड मतं मिळवून देताना जी मेहनत केली आहे त्या मेहनतीला सलाम असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी सांगितले आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार यांनी विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात होतानाच या विधानसभा मतदारसंघात मला विरोधकच नाही, माझ्यासमोर कोण उभच राहू शकत नाही, जर उभा राहिला तर त्याला असा लोळवतो की तो पुन्हा उभाच राहणार नाही आणि कोणी जरी लढला तरी माझे मताधिक्य हे 50,000 च्या वरचे असेल अश्या वल्गना केल्या होत्या. मात्र या विधानसभेत भाजपाचे पालक रविंद्र चव्हाण पालकमंत्री उदय सामंत माजी आमदार डॉ.विनय नातू, आमदार रविंद्र फाटक, जिल्हाध्यक्ष केदार साठे नगरसेवक राजेश मोरे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, कुणबी सेना,बळीराज सेना आणि सर्व घटक पक्षांच्या मदतीने सन्मा.राजेश बेंडल यांच्या नेतृत्वात महायुतीने अशी काही मोट बांधली की विद्यमान आमदारांना विजयासाठी घाम फोडला आणि यातच विद्यमान आमदारांना आपण 17 वर्ष नेतृत्व करत असताना कोणत्या स्तराला आहोत याची जाणीव करून दिली. या गुहागर विधानसभेत मी आणि मीच आहे माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही अशी ज्यांची भावना होती त्यांना या विधानसभेतील मतदारांनी जागेवर आणले. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या लाडक्या बहिणी असतील किंवा योजनांचे अनेक लाभार्थी असतील यांनी सडेतोड उत्तर मतयंत्रातूनच दिले आहे. नशिबाने थोडीशी हुलकावणी दिल्यामुळे राजेश बेंडल यांचा पराभव झाला असला तरी महाराष्ट्रात महायुतीचे भक्कम सरकार आले असल्यामुळे गुहागर तालुक्यातील नव्हे तर गुहागर विधानसभा मतदारसंघातील जनतेने बिनधास्त राहावे. सर्वांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने, शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने, विकास कामांच्या दृष्टीने, रोजगार निर्मितीच्या दृष्टीने, कौशल्य विकासाच्या दृष्टीने महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ही कायमच चार पावले पुढे राहील. असे भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी सांगितले आहे.