चिपळूण – अल्पावधीतच शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरलेल्या वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रकल्पातर्फे हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनी १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता चिपळूण बहादूरशेखनाका येथील सहकार भवनातील सहकार सभागृहात कृषी मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
कोकणातील शेतकरी शेतीपूरक दुग्ध व्यवसायातून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, अशी धारणा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांची होती. यानुसार सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुमारे दोन वर्षांपूर्वी पिंपळीखुर्द येथे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आणि काही महिन्यातच हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू झाला. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.
इतक्यावरच न थांबता वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने दिनांक ५ ते ७ जानेवारी दरम्यान वाशिष्ठी कृषी, पशुसंवर्धन प्रदर्शन २०२४ महोत्सवाचे आयोजन केले होते. या कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांसह कोकणवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर या महोत्सवाचे मान्यवरांसह सर्वांनीच भरभरून कौतुक केले.
तर आता वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे हरितक्रांती चे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनी १ जुलै रोजी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कनिष्ठ मृद शास्त्रज्ञ डॉ. पी. जी. आहिरे, भाजीपाला विशेषज्ञ डॉ. पी. बी. सानप, पंचायत समिती चिपळूण तालुका अभियान व्यवस्थापक अमोल काटकर कृषीविषयक माहिती तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे करण्यात आले आहे.