गुहागर – देशभरात नुकत्याच लोकसभा निवडणुका संपन्न झाल्या. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याच वातावरणात सध्या आमदारकीसाठी अनेकजण इच्छुकांच्या रांगेत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे गुहागरमधील आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी देखील यात उडी घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला संधी दिल्यास मी गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेन आणि जिंकेन सुद्धा अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या एकच चर्चा सुरू असून गुहागर मतदारसंघातून नक्की कोण निवडणूक लढवणार याची चर्चा आता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे.
ठाकरे गटाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आपण चिपळूणसाठी इच्छुक असल्याचे यापूर्वीच म्हटले होते. यातच त्यांच्या सुपुत्राने देखील आमदारकीसाठी इच्छा व्यक्त केल्याने भास्कर जाधव आपल्या मुलाला राजकारणात आणण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.विक्रांत जाधव म्हणाले, आपण थेट विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करतोय अशातला भाग नाही तर मी गेले दहा वर्ष या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात येऊन आपण जिल्हा परिषद सदस्य झालो विरोधी पक्षनेता झालो अध्यक्ष झालो अशी अनेक पद भूषवताना आपण लोकांची काम केली आहेत. माणूस हा नेहमीच पुढे जाण्यासाठी इच्छा व्यक्त करत असतो त्यामुळे माझ्या नशिबात असेल तर मी नक्कीच विधानसभा निवडणूक लढवेन, पण मला त्यासाठी उद्धव साहेबांच्या आशीर्वादाची गरज आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघ हा आमदार भास्कर जाधव यांचा कायम बालेकिल्ला राहिला आहे. ते या मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार आहेत. ते आपले वडील असले तरी राजकारणात ते माझ्याकडे मुलगा या नात्याने पाहत नाहीत एक कार्यकर्ता म्हणूनच पाहतात. त्यांच्या विधानसभेतील मताधिक्य मोदींच्या लाटेतही कायम वाढतं राहिलं आहे, असेही विक्रांत जाधव यांनी नमूद केले आहे.
दरम्यान भास्कर जाधव यांनी आपण चिपळूण विधानसभा मतदारसंघ हा माझा पूर्वीचा मतदारसंघ असून इथून मी इच्छुक का असू नये असा सवाल केला होता. तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून शब्द घेतला. इतकंच नव्हे तर महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले प्रशांत यादव यांचीही आपण भेट घेतल्याचे स्पष्ट केले होते.
चिपळूण विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव ही निवडणूक लढवणार का? यावर विक्रांत जाधव म्हणाले की, आम्हाला दोन्ही आमदारकी हव्या आहेत, असं अजिबात नाही. पण चिपळूण मतदारसंघ हा १९९० पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. तो मतदारसंघ परत महाविकास आघाडीला पर्यायाने शिवसेनेला मिळवून आपल्या जागा वाढव्यात यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत गुहागर व चिपळूण या दोन्ही जागांमध्ये सुरु असलेली रस्सीखेच कोणत्या निष्कर्षावर येऊन पोहोचणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.