गुहागर – गुहागर तालुक्यातील एका शिक्षकाच्या चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीमधील दोन पाटील आणि एका पोषण आहाराच्या अधिकाऱ्याला एका शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शृंगारतळी येथील एका आलिशान वातानुकुलित हाँटेलात मेजवानी दिल्याची एकच चर्चा तालुक्यात सुरु आहे. या समितीमधील या तीन अधिकाऱ्यांवर हा शिक्षण अधिकारी मेहरबान का, असा सवाल उपस्थित होत आहे. या मेजवानीत काही अधिकाऱ्यांचे हातावर हात देतानाचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत.
गुहागर तालुक्यातील एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःची बदली दुसऱ्या शाळेवर करुन घेतली होती. आणि इथेच प्रकरण वाढले …. कारण गुहागर शिक्षण विभागाला त्यांनी स्वतः करून घेतलेली बदली हि मान्य नव्हती. त्यांनी या शिक्षकाच्या स्वेच्छेच्या बदलीला विरोध केला होता. अखेर या शिक्षकाने जिल्हास्तरावरुन प्रयत्न करुन आपली बदली करुन घेतली. आणि हे प्रकरण काहीसं वादग्रस्त ठरला या दरम्यान या शिक्षकाच्या चौकशीबाबत जिल्हास्तरावर एक त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमधील तीन सदस्यांना गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळी येथील एका आलिशान हाँटेलमध्ये शिक्षण विभागाच्या एका मुख्यअधिकाऱ्याने मेजवानी दिली. या मेजवानीला शिक्षण विस्तार अधिकारीही उपस्थित होते. मेजवानीचा हा एकजुटीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. गुहागर शिक्षण अधिकारी आणि चौकशी समितीचे अधिकारी यांच्या झालेल्या या मिलिभगत मेजवानीची खमंग चर्चा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात आता ही समिती नक्की कोणाच्या बाजूने न्याय निवाडा करणार.? याची चर्चा सध्या गुहागर सह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे. एखाद्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आलेल्या समितीने चौकशी दरम्यान अशी रंगीत पार्टी घेतल्याने खरोखरच ही चौकशी निपक्षपणे पार पडेल का ? असा प्रश्नही त्या निमित्ताने उभा राहिला आहे.