चिपळूण – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीत सुद्धा अद्यापपर्यंत जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. ज्यामुळे यांच्यामधील जागा वाटपाचा तिढा सुटणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आगामी लोकसभेत महायुतीने 48 पैकी 45 जागांवर विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. त्या पद्धतीने आता त्यांच्याकडून मोर्चेबांधणी देखील करण्यात येत आहे. परंतु, राज्यातील बहुतांश लोकसभेच्या जागा अशा आहेत, ज्या जागांवर भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाकडून दावा करण्यात आलेला आहे. अशीच एक जागा आहे ती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची. या लोकसभेच्या जागेमुळे आता भाजपा-शिवसेनेमध्ये वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतून भाजपाकडून मंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे वरिष्ठांकडून आता त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही समोर आली आहे. परंतु, याच लोकसभेच्या जागेवर शिवसेना शिंदेगटाकडूनही दावा करण्यात येऊ शकतो, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. या जागेवरून मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण रवींद्र सामंत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. तशा प्रकारची हिंट देणारा स्टेटसही किरण सामंत यांनी शेअर केल्याने कोकणातील राजकारणात खळबळ उडाली आहे. “मी… मी किरण रवींद्र सामंत… रोकेगा कोण?” असा स्टेटस शेअर केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
शिवसेनेकडून या जागेवर आधीच आपला दावा सांगितला आहे. परंतु, भाजपाने अप्रत्यक्षपणे या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होतेय. भाजपाने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची मागणी केल्यामुळे शिंदे गट आक्रमक झाला आहे. त्यामुळे कोकणातील मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. पण आता या प्रकरणी किरण सामंत यांच्याकडून वेगळा खुलासा करण्यात आला आहे. जर का रवींद्र चव्हाण यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली तर ते त्यांचाही प्रचार करतील, असे किरण सामंत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.