लांजा-रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीकडून वारंवार पैशाची मागणी होत असल्याच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने तिचा कायमचा काटा काढला आहे. ही घटना तब्बल अडीच महिन्यांनी उघडकीस आली असून वैशाली चंद्रकांत रांबाडे असे मृत प्रेयसीचे नाव असून लांजा पाेलिसांनी तिच्या खुनाप्रकरणी राजेंद्र गाेविंद गुरव याला अटक केली आहे.
कोंड्ये येथील वैशाली चंद्रकांत रांबाडे हिचे राजेंद्र गोविंद गुरव याच्याशी प्रेमसंबंध हाेते. त्यानंतर वैशाली रांबाडे ही राजेंद्र गुरव याच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होती. वारंवार हाेणाऱ्या पैशाच्या मागणीला राजेंद्र कंटाळला होता. या दाेघांमध्ये दि. २८ जुलै रोजी रात्री मोबाईलवर जवळपास एक तास बोलणे झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ती कुवे येथे डॉक्टरकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती.
मात्र, डाॅक्टरकडे न जाता ती राजेंद्र गुरव याच्यासाेबत दि. २९ जुलै रोजी कुवे येथे जंगलमय भागात गेली हाेती. राजेंद्र याच्या मनामध्ये धगधगत असलेल्या रागातून त्याने वैशालीच्या मानेवर काठीने जोरदार प्रहार केला. त्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर ताे घरी निघून आला. वैशाली ही रात्र झाली तरी डॉक्टरकडून घरी न आल्याने तिच्या पतीने शोधाशोध सुरू केली. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर तिच्या पतीने दि. ३० जुलै रोजी लांजा पोलिस स्थानकात पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. यानंतर पोलीसांकडून तिचा शोध सुरू होता.
तब्बल अडीच महिन्यांनंतर तिच्या पतीने दि. ११ ऑक्टोबर रोजी लांजा पोलिस स्थानकात राजेंद्र गुरव याने तिला फूस लावून पळवून नेत गायब केल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत राजेंद्र गुरव याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची पोलिस कोठडीत पोलीसांनी चौकशी केली असता त्याने आपण वैशाली हिचा कुवे येथील जंगलमय भागात खून केल्याचे सांगितले.
उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, सहायक पोलिस फौजदार भालचंद्र रेवणे, पोलिस हवालदार जितेंद्र कदम, पोलिस हवालदार अरविंद कांबळे, पोलिस हवालदार दिनेश आखाडे, पाेलिस काॅन्स्टेबल नितेश राणे, कॉन्स्टेबल सुयोग वाडकर, महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रियांका कांबळे, चालक कॉन्स्टेबल चेतन घडशी, सहायक पाेलिस फाैजदार संजय जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या पंचनाम्यात झाडाझुडपांमध्ये असलेल्या वस्तू शोधून काढल्या. याप्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करत आहेत.