खेड – रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खेड लोटे येथील एमआयडीसी या भागांमध्ये काही कंपन्यांमधील बाहेरून येणारे मजूर यांच्यामार्फत संसर्ग होत असल्याचे मागील काही घटनांवरून दिसून आले आहे. यावरती कारवाई करावी व्हावी अशी मागणी मनसेने व इतर सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी वारंवार केली आहे.
लोटे येथील या कंपन्यांमध्ये जाणारे स्थानिक मजूर यांना देखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे मागील काही घटनांवरून दिसून आले आहे. आज मुंबई-गोवा महामार्ग खेड याठिकाणी बाहेरून कामगार घेऊन येणाऱ्या 2 बसेस मनसे कार्यकर्तांनी अडविल्या या कामगारांकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. तर ज्या परिसरात यांना ठेवण्यात येणार होते त्या भागातील ग्रामसमितीला याबाबत माहिती नसल्याचे पुढे येत आहे. असे मत मनसे खेड तालुका प्रमुख संदीप फडकले आणि हेमंतराज बावदाने यांनी व्यक्त केले.
राज्यात 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन आहे मग हे कामगार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात कसे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर स्थानिकांना रोजगार मिळत नाही आणि बाहेरील लोकांकडून कंपन्यांमधील कामे केले जातात यावरही त्यांनी यानिमित्ताने आक्षेप घेतला आहे. हे कामगार गुजरात येथून रत्नागिरी जिल्ह्यात आल्याचे समजते. यामध्ये साधारण 22 कामगारांचा समावेश आहे.

 
             
		
