चिपळूण – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज चिपळूण येथे पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी व शिवनदी दुथडी भरून वाहत आहे. या परिस्थितीमुळे येथील प्रशासन व नगर परिषद नियंत्रण कक्ष सतर्क झाले आहे. बाजारपेठही पाणी शिरल्याने नगर परिषदेने सलग तीन वेळा भोंगा वाजवून व शहरात गाडी फिरवून सतर्कतेचा इशारा दिला. व्यापारी वर्गासह नागरिक धास्तावले आहेत.

चिपळूण. येथे दोन दिवस पाऊस संततधार सुरू आहे. मात्र मंगळवारी सायंकाळपासून धो-धो पाऊस पडतो आहे. या पावसामुळे येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. बुधवारी पहाटेपासून येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर देखील पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीने पुन्हा धोक्याची पातळी गाठली. बाजारपुलाच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील मुख्य रस्ता बंद पडला आहे. या परिस्थितीमुळे येथील व्यापारी वर्ग धास्तावला असून काहींनी दुकानातील माल हलवण्यास सुरुवात केली आहे. तसेच नगर परिषदेने सकाळी ९.३० वाजता सलग तीन वेळा भोंगा वाजवून सतर्कतेचा इशारा दिल्याने बाजारपेठ परिसरातील नागरिकांनीही घरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.

१. सध्या वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नाईक कंपनी/ मच्छी मार्केट, वडनाका, चिंचनाका,मुरादपूर येथील काही ठिकाणी १ फूट पाणी भरलेले आहे.
२. नगरपालिकेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, ST stand, नगरपालिका कार्यालय या ५ ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत.

३. नगरपालिका पथके ९ ठिकाणी तैनात आहेत.
४. तलाठी, पोलीस व NDRF पथके ६ ठिकाणी तैनात केलेली आहेत. एका पथकात ५ तलाठी, ३ पोलीस व ३ जवान आहेत. या पथकासोबत एकूण ४ बोटी आहेत.
६ ठिकाणे- नाईक कंपनी, ओसवाल शॅापी, वडनाका, मुरादपूर, सांस्कृतिक केंद्र, पेठमाप
५. सध्या एका कुटुंबातील ( शिंदे) ३ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे.
६. परशुराम दरड कोसळली होती मात्र आता वाहतूक सुरु आहे.
७. कुंभार्ली घाटात दरड कोसळलेली होती. तेथील दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. आता दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू आहे.
८. कोकण रेल्वे- कोणतीही समस्या नाही. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
९. मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. ते सर्वजण आपल्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतरीत झाले आहेत.
१०. मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशाने चिपळूण व खेड या दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.
सह्याद्री खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोलकेवाडी आणि पोफळी २२० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तसेच चिपळूण परिसरात 143.88 मिलिमीटर, तर आतापर्यंत 1300.99 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.