चिपळूण – चिपळूण शहरातील गोवळकोट पेठमाप येथील वाशिष्ठी नदीवरील एन्रॉन पुलाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त सापडला आहे. या रखडलेल्या पुलाचे काम व्हावे, यासाठी सातत्याने युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांच्यासह काहींनी पाठपुरावा केला आहे. तर काही दिवसांपूर्वी या कामाचा ठेकेदार हरवला आहे. तो शोधून आणणाऱ्याला बक्षीस दिले जाईल असे उपरोधिक आवाहन केले होते. अखेर या ठेकेदाराने शुक्रवारपासून या पूलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.
दि. २१ जुलै २०२१ च्या अतिवृष्टी व वाशिष्टी नदी ला आलेला महापुराचा एन्रॉन पुलालाही मोठा फटका बसला होता. हा पूल मध्यवर्ती भागातच खचला. त्यानंतर सुरक्षितेचा उपाय म्हणून आणि कोणतीही दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. मात्र, हा पुल वाहतुकीसाठी बंद केल्याने प्रवासी वर्गासह स्थानिक नागरिक आणि लोटे औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या कामगारांची ही मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या एन्रॉन तातडीने दुरुस्ती व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधीसह स्थानिकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह, सामाजिक कार्यकर्ते खालीद दाभोळकर, सुनील सावर्डेकर, सुधीर शिंदे, माजी नगरसेवक परिमल भोसले, वहाब सुर्वे, माजी नगरसेवक इनायत मुकादम, अल्ताफ काद्री यांनी आवाज उठवला शिवाय सातत्याने पाठपुरावा देखील सुरूच ठेवला.
दरम्यान, आमदार शेखर निकम यांनी एन्रॉन पुलाच्या दुरुस्तीचा मुद्दा अधिवेशनात मांडून शासनाचे लक्ष वेधले होते. यानंतर तातडीने या पूलाच्या कामासाठी १ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच या पुलाच्या दुरुस्तीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करून व तांत्रिक गोष्टी तपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन वेळा निविदा प्रक्रिया पार पडली होती. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा तिसरी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये देवरे अँड कंपनीला या कामाचा ठेका मिळाला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरदीप रामसे यांनी दोन महिन्यापूर्वी ठेकेदार कंपनीला कामाचे आदेश दिले.
परंतु या पूलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात न झाल्याने या पूलाचे काम कधी पूर्ण होणार ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी ठेकेदार हरवला आहे. शोधून आणणाऱ्याला बक्षीस दिले जाईल, असे उपरोधिक आवाहन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या आवाहनाची तात्काळ दखल घेत ठेकेदाराने शुक्रवारपासून या पुलाच्या कामाच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. अखेर सर्वांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.