गुहागर ; काताळे ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीमध्ये भाजपाचा ठाकरे गटाला दे धक्का , जागतिक महीलादिनी या बनल्या सरपंच….

0
631
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील तवसाळ, तवसाळ खुर्द,कातळे या तीन महसुल गावांचा समावेश असणा-या कातळे ग्रामपंचायतीची नव्या सरपंच म्हणून भाजपच्या प्रियांका सुर्वे यांची निवड झाली.

2021 साली सार्वत्रिक निवडणूक झाली होती. यावेळी महाविकास आघाडीने बाजी मारत भारतीय जनता पार्टीच्या प्रियांका सुर्वे यांचा पराभव केला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हा सरचिटणीस विजय मोहिते यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व करत राष्ट्रवादीला सरपंचपद मिळवून दिले होते. माञ काही दिवसापूर्वी तत्कालीन जिल्हा सरचिटणीस विजय मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट बाजी मारणार अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र गुहागर भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांना दोन वर्षांपूर्वी आपल्या पत्नीच्या झालेल्या पराभवाची सल कायम होती. त्या पराभवाची परतफेड करण्याची निर्माण झालेली संधी निलेश सुर्वे यांनी योग्य उपयोगात आणत अतिशय संयमी आणि शांतपणे दोन वर्षांपूर्वी पराभूत झालेल्या आपल्या पत्नीला प्रियांका सुर्वे यांना सरपंचपदी विराजमान केले.

महाविकास आघाडीकडे नऊपैकी सहा जागा असतानाही प्रियांका सुर्वे यांना 5 मत मिळाली, एक मत बाद झाले तर महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रावणी नाचरे याना फक्त 3 मते मिळाली. प्रियांका सुर्वे यांना मिळालेली अधिकची 2 मते कोणाची ? बाद झालेले मत कोणाचे ? आणि बाद झालेले मत हे मुद्दाम बाद करायला लावले का ? याची जोरदार चर्चा तवसाळ कातळे पंचक्रोशी मध्ये सुरू आहे.

महिला दिनाच्या दिवशी तवसाळ पंचक्रोशीची ग्रामदेवता श्री महामाई सोनसाखळी देवीच्या शिमगा उत्सवाच्या दिवशी प्रियंका सुर्वे यांचा अनपेक्षित पणे झालेला विजय हा पंचक्रोशीमध्ये जसा चर्चेचा ठरत आहे तसेच वाणिज्य पदवीधर व डीएड धारक असणाऱ्या या उच्चशिक्षित महिलेवर परिसरातून अभिनंदनाचा वर्षावही होत आहे. राष्ट्रवादीत असताना महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांना एकत्रित ठेवण्यात आलेले यश ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर विजय मोहिते यांना टिकवता आले नसल्याची चर्चाही पंचक्रोशीत रंगत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here