बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा विभागातील दोघांनी ४ कोटी ८ लाखाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ठेकेदारांनी ठेवलेली अनामत रक्कम परस्पर ऑनलाईन पद्धतीने बोगस ठेकेदाराच्या नावाने वळवले आहे. या प्रकरणी एका महिलेसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.

गेले काही दिवस पोलिसामार्फत यविषयीची चौकशी सुरू होती. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात लिपीक म्हणून कार्यरत असलेले जीवन खंडझोडे व प्रतिक भिंगार्डे यांनी काही मित्र व नातेवाईकांच्या बँक खात्यात ऑनलाईन रक्कम वर्ग केली. त्यानंतर पुन्हा एक-दोन दिवसातच या दोघांनीही सदरची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवली. तब्बल दोन वर्षे हा प्रकार टप्प्या-टप्प्याने सुरू होता. याविषयी खात्री पटताच पोलिसांनी संबंधीतांना ताब्यात घेत अटक केली आहे. या प्रकरणी जीवन खंडजोडे प्रतिक भिंगार्डे , रजनीश टाकळे , संदीप आंबुर्ले, प्रविण भिसे , परेश भिंगार्डे व एका महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची फिर्याद चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजीत रामसे यांनी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा विभागातील व्यवहारात काहीशी अनियमीतता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे याविषयी त्यांनी पोलिसांची मदत घेतली.

या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का, यादृष्टीने पोलिस तपास सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी व पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी मोठ्या शिताफीने हा प्रकार उघडकीस आणला. तितक्याच तातडीने त्यांनी संशयीत आरोपींच्या मुसक्याही आवळल्या आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here