गुहागर – गुहागर विधानसभा मतदारसंघात भास्कर जाधव यांना एक मोठा राजकीय धक्का बसला त्यांच्याच या मतदारसंघात आता शिंदे गट आपले पाय पसरू लागला.
भास्कर जाधव यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत या आधीच गुहागर युवासेना तालुकाप्रमुख अमरदीप परचुरे,उपतालुका प्रमुख महेश तावडे सह चार सरपंचांचा शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर अजूनही काही कार्यकर्ते शिंदे गटात जाणार त्याची चर्चा संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरू होती. त्याप्रमाणे दसरा मेळाव्यानंतर आता शिंदे गटातल्या पक्ष प्रवेशाने जोर घेतलाय.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर २०१९ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर विधानसभा मतदार संघातले उमेदवार सहदेव बेटकर आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला गुहागर तालुक्यातून चार खाजगी बसेस घेऊन मेळाव्याला हजर होते.
तर गुहागर तालुक्यातील तरुणांचा आयडॉल रोहन भोसले यांनी अनेक तरुणांना एकत्रित करत आज उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गुहागर नगरपंचायतचे बांधकाम सभापती अमोल गोयथळे सह अनेक कार्यकर्ते शिंदे गटामध्ये सामील केले. तसेच यावेळी सदानंद पवार – धोपवे सरपंच ,संतोष सावरकर -कोळवली सरपंच यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. आगामी काळात भास्कर जाधव यांना राजकीय पेचात पकडण्यासाठी शिंदे गट अजूनही जोरदारपणे सक्रिय करणार असल्याची चर्चा सध्या गुहागर तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे आता भास्कर जाधव नक्की काय भूमिका घेतायत हे येणाऱ्या काही दिवसातच समजेल असे भास्कर जाधव यांचे समर्थक सांगत आहेत.