मंडणगड ; 4 लाखाच्या पाचशे, हजारच्या जुन्या नोटा जप्त

0
193
बातम्या शेअर करा

मंडणगड – मंडणगड बस स्थानक परिसरात 4 लाखांच्या जुन्या चलनी नोटा जप्त करत एका व्यक्तीवर एलसीबी रत्नागिरी व स्थानिक पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

कायदेशीररित्या जुन्या नोटा चलनात आणण्यासाठी प्रतिबंधित झाल्या असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटा सापडून आल्याने या नोटा नेमक्या कोठे नेण्यात येत होत्या, याचा तपास पोलीस करत आहेत. या बाबत मंडणगड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता आसिफ मकसुद खान यांच्या चारचाकी टाटा नॅनो गाडीत 1000 रुपयांच्या दर्शनी मूल्य असणाऱ्या 300 नोटा, 500 रुपयांच्या दर्शनी मूल्य असणाऱ्या 195 नोटा अशा एकूण 3 लाख 97 हजार 500 रुपयांच्या नोटा सापडून आल्या. भारत सरकारने नोटबंदीनंतर दिलेल्या कालावधीत या नोटा बदलून न घेता माहित असतानाही बंद नोटांचा अवैधरित्या साठा केल्याचे आढळले.मंडणगड तालुक्यात अशा प्रकारे बंद झालेल्या जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. या नोटा नक्की कुणाच्या आहेत, त्या मंडणगडमध्ये कशा आल्या, या बाबत पोलिसांनी आसिफ याला विचारणा केली असता त्याने समर्पक उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. मात्र या नोटा बदलण्यासाठी मंडणगड येथे आल्याचे सांगितल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. सेशन ऑफ लायबीलिटीज (आरबीआय) 2017 कायद्यांतर्गत 3,5,7 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या नोटा नेमक्या कुठून कोठे जात होत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here