गुहागर – प्रेम विवाह केला म्हणून पोलीस पाटलाच्या सांगण्यावरून व समाजाच्या सांगण्यावरून आईने आणि सख्या भावाने त्या नवविवाहित जोडप्याला घराबाहेर काढले आणि आता ते नवविवाहित जोडपे चक्क एका एसटी पिकशेड मध्ये राहत आहे. प्रेम विवाह केला हा आमचा गुन्हा काय ? असा प्रश्न या नवविवाहितांकडून विचारला जातो.
गुहागर तालुक्यातील मढाळ येथील सोलकर कुटुंबातील विजय सोलकर या तरुणांने आपल्याच वाडीतील एका तरुणीशी विवाह केला. त्यानंतर आपल्या पत्नीसोबत तो मुंबई येथे कामानिमित्त राहत होता. आता कोकणातील महत्त्वपूर्ण असा गणेशोत्सव सणासाठी तो गावी आला असता त्याला आई आणि भावाने घरात प्रवेश नाकारला यावेळी गावचा पोलीस पाटील यांनी त्या मुलाच्या भावकीला एकत्र जमवत तुम्ही या नवविवाहित जोडप्याला घरामध्ये ठेवू नका अन्यथा आम्ही तुम्हाला वाळीत टाकू अशी धमकी देत घरामध्ये ठेवण्यास विरोध केला. यावेळी त्या मुलाच्या आई आणि भावाने रात्रीच्या वेळी त्या नवविवाहित जोडप्याला घराबाहेर काढले या सर्व प्रकाराला त्याच्या वडिलांनी विरोध केला मात्र पोलीस पाटलाच्या दबावापुढे त्याच्या वडिलांचे काही चालले नाही. अखेर त्यांनी समाजापुढे आणि पोलीस पाटलापुढे हार मानली.
या नवविवाहित जोडप्याने याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात 5 सप्टेंबर रोजी रितसर तक्रार नोंदवली याबाबत अद्यापही या जोडप्याला न्याय देण्यास गुहागर पोलिसांना यश आलेले नाही. परिणामी आपण गणपतीला गावाला आलोय …गणपती बाप्पाचे आपल्याला दर्शन घ्यायचे तेही आपल्याला घेता आले नसल्याचे दुःख या जोडप्याला आहे. सध्या हे जोडपं त्याच गावातील एका एसटीच्या पिकप शेडमध्ये राहत आहे. येत्या एक-दोन दिवसात आपल्याला जर न्याय मिळाला नाही तर आपण पुन्हा एकदा आपल्या कामाच्या ठिकाणी म्हणजे मुंबई येथे जाणार असे त्यांनी सांगितले.
याबाबत गावातीलच माझी तंटामुक्त अध्यक्ष विपुल सकपाळ यांनी असे सांगितले की हे पोलीस पाटील नेहमीच अरेरावी करतात गावात असणारा तंटा त्यांना कधीच मिटवता येत नाही. यामुळे या जोडप्यावर हे दिवस आले असे सांगितले.
सुरेश शिर्के यांनी याबाबत संताप व्यक्त करत असे सांगितले की हा विषय किरकोळ होता गावच्या ठिकाणी मिटवता आला असता मात्र पोलीस पाटील आणि तंटामुक्त अध्यक्ष हे गावात मनमानी करत असल्याने हा विषय मिटवता आला नाही अशी खंत व्यक्त केली.
याबाबत गुहागर पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता तो त्यांचा घरगुती विषय आहे. आम्ही त्याबाबत काही करू शकत नाही असे गुहागर पोलिसांनी सांगितले.
एखाद्या नवविवाहित जोडप्याला जर पोलीस पाटील दमदाटी करून घराबाहेर काढण्यासाठी दबाव टाकत असेल तर त्या पोलीस पाटलावर गुहागर पोलीस कारवाई करणार का ..? किंवा खरंच गुहागर पोलिसांचे प्रयत्न अपूर्ण ठरतात का ? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. सदरक्षणाय खलनिग्रहण असे ब्रीद वाक्य असणारे पोलीस या कुटुंबाला न्याय देणार नसतील तर न्याय नक्की मागायचा कोणाकडे ? असा प्रश्न या कुटुंबापुढे पडला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी त्वरित या प्रकरणी लक्ष घालून त्या कुटुंबाला आपल्या घरात प्रवेश मिळवून द्यावा अशी मागणी आता मढाळ गावातून अनेक जण करत आहेत.