दापोली – दापोली शहरातील एका अल्पवयीन मुलीने प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यास नकार दिल्याने फेसबुकवर या मुलीसंदर्भात अश्लील मजकूर प्रसिद्ध करुन अल्पवयीन मुलीची बदनामी केली.
दापोली पोलिसांनी या संशयिता विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार 2 जानेवारी ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत संशयित अनिकेत रवींद्र ढेपे पाटील (वय 24) याने 17 वर्षे 5 महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यासाठी सांगितले, मात्र या मुलीने त्यास नकार दिल्याने अनिकेत याने समाज माध्यमावर या मुलीचा फोटो टाकून अश्लील मजकूर पोस्ट केला, यामुळे बदनामी झालेल्या या मुलीने अखेर दापोली पोलीस ठाण्यात संशयित अनिकेत ढेपे पाटील यांचे विरोधात तक्रार दाखल केली आहे. दापोली पोलीस ठाण्यात अनिकेत विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार भादवी 354 ड ,509,506,पोस्को कलम 12 तसेच आयटी ऍक्ट 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक आहिरे करत आहेत.