‘हॉटमिक्स’ डांबरीकरणामुळे कराड – चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाट झाला सोयीस्कर

0
70
बातम्या शेअर करा

चिपळूण – गेल्या अनेक वर्षांत प्रथमच चिपळूण तालुक्यातील संपूर्ण कुंभार्ली घाट चकाचक झाला आहे. मागील झालेल्या अतिवृष्टीत कुंभार्ली घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली होती.

या घाटातील सोनापात्र भागात रस्ता धोकादायक बनला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘हॉटमिक्स’ डांबरीकरण केल्याने प्रवास सोयीस्कर झाला आहे. गुहागर-विजापूर मार्गावरील हा घाट कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडतो. १३ किलोमीटर लांबीच्या घाट रस्त्यात अनेक नागमोडी वळणे आहेत. पावसाळ्यात घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळतात. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात खबरदारी घेतली जाते. गतवर्षी मोठ्या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटवण्यात आल्या. मात्र, अनेक ठिकाणी दरडींची माती नाल्यात गेल्याने ते बुजले होते. शिवाय वाढलेल्या झाडीमुळे रात्रीच्यावेळी समोरून येणारे वाहन आणि साईडपट्टी समजत नव्हती. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता. पोफळीपासून काही अंतरावर असलेल्या सोनपात्राच्या ठिकाणी पूर्णतः रस्ता खचला होता. अनेकदा वाहने अडकून पडली होती. दोनवेळा पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. तसेच अन्य ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले होते. यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दर्जेदार डांबरीकरण केले आहे. या डांबरीकरणासाठी घाट दोन दिवस बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू ठेवूनच घाटात डांबरीकरण केले. तसेच हेलवाक, पाटण या भागातही डांबरीकरण झाल्याने चिपळूण ते कराडचा प्रवास प्रथमच सुखकर झाला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here