गुहागर – गुहागर तालुक्यातील बहुतांशी गावातील महिला बचत गटांच्या सदस्यांना अगरबत्तीचा उद्योग करण्यासाठीचे मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवून त्यांना तोंडघशी पाडणाऱ्या दापोली तालुक्यातील घडवले नामक ठकसेनाचा महाप्रताप सध्या उघडकीस आला आहे.
या घडवले नामक ठकसेनाने बचत गटांच्या सदस्यांकडून अगरबत्ती उद्योगाचा माल पुरवण्यासाठी लाखो रुपये उकळले परंतु सुरुवातीला त्याने इमाने इतबारे व्यवहार केला. परंतु त्यानंतर मात्र आता त्याने पूर्णपणे पाठ फिरवल्याने लाखो रुपये गुंतवलेल्या महिला मात्र चिंतीत झाल्या आहेत. यामध्ये शृंगारतळी परिसरातील महिलांसह काही सुशिक्षित पुरुषही या बाबीचे शिकार झाले आहेत.
या विषयी विचारणा करण्यासाठी बचत गटाच्या महिला घडवलेला मोबाईल वरून संपर्क करण्याचा प्रयत्न करीत असता तो फोनच उचलत नाही. आपले राहण्याचे ठिकाणही तो वारंवार बदलीत असतो. त्यामुळे त्याला शोधणे सर्वसामान्यांना शक्य होणार नसणारेच दिसते. या व्यवसायात गुंतवण्यासाठी अनेक महिलांनी आपले दाग – दागिने गहाण ठेवून पैसे उभे केले. आता या महिलांपुढे हे दागिने पुन्हा सोडवण्यासाठी आटा – पिटा करावा लागणार आहे. या घडवलेच्या प्रतापाने हैराण झालेल्या महिला अखेर वाट पाहून थकल्यामुळे आणि त्यांची सहनशक्ती संपल्यामुळे शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते.
दापोलीतील “घडवले” कडून सावित्रीच्या लेकींची फसवणूक ?
आजपर्यंत आपण एखादी बोगस मार्केटिंग कंपनी, एजन्सी, संस्था यांच्याकडून गुंतवणूक दरांची फसवणूक झाल्याचे ऐकले आहे. पैशांची गुंतवणूक करून दाम दुप्पटचे आमिष दाखवायचे व नंतर हि संस्था, एजन्सी, कंपनी बंद करून गाशा गुंडाळायचा असे अनेक गैरप्रकार अलीकडच्या काळात घडून आले आहेत. यामध्ये आता काही व्यावसायिकही मागे राहिले नाहीत. सुमारे दीड वर्षांपूर्वी शृंगारतळीत एका दापोलीतील व्यावसायिकाने येवून येथील काही महिला बचत गटांना अगरबत्ती बनविण्याचे कीट दिले. अगरबत्ती माल बनवून झाला कि, तो व्यावसायिक माल विक्रीसाठी घेऊन जायचा. मालाची विक्री झाली कि, मोबदला देईन अशी आश्वासने द्यायचा. असा कित्येक महिने हा प्रकार सुरु होता. मात्र मोबदला मिळत नसल्याचे लक्षात येताच येथील महिला बचत गट सावध झाले. त्यांनी संबंधित व्यावसायिकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अद्याप साधता आला नाही. या व्यवसायामध्ये काही शिक्षक असून ग्रा.पं. च्या कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचे समजते. दापोलीतील “घडवले” यांनी हि कहाणी घडवून सावित्रीच्या लेकींची फसवणूक केली आहे.
आम्ही वारंवार फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. दापोली येथील घडवले यांच्या निवासस्थानी देखील जाऊन आलो, मात्र त्यांनी त्यांच्या निवासाचे स्थानही बदलले आहे. आमची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आम्ही लवकरच पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहोत. …..( बचत गटातील महिला )